खानापूरात तिन्ही उमेदवार समर्थकांचे मताधिक्याचे दावे

खानापूर तालुक्यातील प्रमुख नेत्यांचे एकत्र येणे, तालुक्यातील उमेदवार, कार्यकर्त्यांचे सोयीचे राजकारण व तालुक्याची बदललेली राजकीय स्थिती यामुळे खानापूर तालुक्यात कोणाला मताधिक्य मिळतेय, याची उत्सुकता लागून राहिली आहे. पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघात असताना कायम दुर्लक्षित राहिलेल्या खानापूर तालुक्याला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड महत्त्व आल्याचे दिसून आले.

खानापूर तालुक्याला चंद्रहार पाटलांच्या रूपाने पहिल्यांदाच मिळालेली अधिकृतरीत्या पक्षाची उमेदवारी, खासदार संजय पाटील यांच्यासाठी आघाडी धर्माचे पालन करीत तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे एकत्र येणे, कार्यकर्त्यांनी नेत्यांचे आदेश धुडकावीत केलेले सोयीचे राजकारण त्यामुळे ही निवडणूक खानापूर तालुक्यासाठी लक्षवेधी ठरली. कुस्ती व बैलगाडा शर्यतीमुळे प्रसिद्धीस आलेल्या चंद्रहार पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून लोकसभा निवडणुकीसाठी जोरबैठका मारण्यास सुरुवात केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल हाती घेत या लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला होता.

तालुक्यातील उमेदवारी व युवकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे चंद्रहार पाटील खानापूर तालुक्यामध्ये मताधिक्य घेतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. तर खानापूर तालुक्यातील राजकारणात एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व आमदार गोपीचंद पडळकर हे आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी राजकीय मतभेद ठेवून एकत्र आले. त्यामुळे या तिन्ही नेत्यांच्या पाठबळामुळे संजय पाटील यांच्या समर्थकांनी तालुक्यात कमळाला प्रचंड मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे.

तर काँग्रेसची उमेदवारी डावलल्यामुळे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेल्या विशाल पाटील यांच्यासाठी तालुक्यातील दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी काम केल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातून पाकिटाला मताधिक्य मिळण्याचा दावा विशाल पाटील समर्थकांमधून केला जात आहे.