खानापूर नगरपंचायततर्फे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, विद्यार्थी नागरिकांची अलोट गर्दी

१९ फेब्रुवारीला शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक भागात केलेले होते. खानापूर नगरपंचायतीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व समकालीन संदभांचे प्रदर्शन आयोजित केले होते. शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी शहरातील विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती. सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणाऱ्या नगरपंचायत खानापूरच्यावतीने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

शस्त्रसंग्राहक अतुल मुळीक यांनी संग्रहित केलेल्या शिवकालीन शस्त्रांचे व संस्थांनकालीन मुद्रांकांचे प्रदर्शन व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान हडपसर यांचे रवी पवार यांनी तयार केलेल्या ‘छत्रपती सूत्र विश्वाचे ‘हे समकालीन संदर्भाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शिवकालीन इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी शहरातील विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी  केली होती. यावेळी ढाली, तलवारी वाघनख्या, दांडपट्टे अशी विविध प्रकारची शस्त्रे तसेच कुरुंदवाड, मिरज, कोल्हापूर अशा विविध संस्थानांचे मुद्रांक तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ ७ पेटिंगच्या प्रती व समकालीन १२५ संदर्भाचे विश्लेषणासह पोस्टर्स असे प्रदर्शनाचे स्वरूप होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे नगराध्यक्षा सौ. सुमन पाटील मुख्याधिकारी सोनाली यादव यांच्यासह नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.