अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रकारात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. खून, मारामारी, अपहरण यांच्या बातम्या आपल्या कानी दररोज पडतच असतात. वडापावच्या गाड्यावरील भजीस हात लावण्याच्या कारणास्तव आटपाडी येथील धनश्री वडापाव सेंटर चालक याने अंकुश आप्पा मासाळ (वय ४२, रा. मासाळवाडी, ता. आटपाडी) यास तेलाच्या झाऱ्याने मारहाण केल्याची घटना सोमवारी आटपाडी नगरपंचायत कार्यालयाजवळ घडली.
याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे, सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंकुश मासाळ हे आटपाडी बाजार पटांगण येथील नगरपंचायत कार्यालयाशेजारी असलेल्या धनश्री वडापाव सेंटर येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते.
तेथे त्यांनी भजी गरम आहेत का हे पाहण्यासाठी त्यांनी भजी उचलल्यावर वडापाव सेंटरच्या मालकाने फिर्यादीस शिवी देत झारा फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. तो दुसऱ्यांदा झारा मारणार इतक्यात अंकुश मासाळ याने त्यांना पकडले. त्यावेळी आरोपीने चाकू काढून फिर्यादीस मारणार इतक्यात नारायण मेटकरी यांनी तो चाकू पकडला. यावेळी नारायण मेटकरी यांच्या हातास जखम झाली.