इचलकरंजी, शहरातील बहुतांशी रस्त्यावर नियमबाह्य गतिरोधक आहेत. त्यातील अनेक अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे ते हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात अत्यंत वर्दळ असलेल्या मुख्य मार्गावरील गतिरोधक हटवले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी असलेला गतिरोधकाचा अडथळा दूर झाला असून वाहन चालविताना अधिक सुलभता येणार आहे. इचलकरंजी शहरातही वर्दळीच्या मार्गावर अनेक गतिरोधक आहेत. पण यातील अनेक गतिरोधक नियमानुसार नाहीत. त्यामुळे असे गतिरोधक अपघाताला निमंत्रण देत आहेत. तर वाहनधारकांनाही कसरत करावी लागत आहे. गतिरोधक केले आहेत.
मात्र त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनचालकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे चालकांना आकस्मिक वाहन थांबविण्याची वेळ येते. परिणामी, पाठीमागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांचा ताबा सुटतो व अपघात होण्याचा धोका संभवतो.याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आयुक्त दिवटे यांनी शासन नियमाप्रमाणे नसलेले गतिरोधक हटवण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. त्यानुसार आतापर्यंत ३० गतिरोधक हटवले आहेत.