सात ग्रामपंचायतींना नोटिसा! सात दिवसात उत्तर देण्याचे निर्देश

पंचगंगा नदीच्याप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा बजावल्या.१४ मे रोजी संयुक्त पाहणीमध्ये पंचगंगा नदीत या दोन्ही महापालिकेसह या सात ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी विनाप्रक्रिया थेट नदीत मिसळत असल्याचे निष्पन्न झाले होते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी या नोटिसा काढल्या असून, सात दिवसांत या नोटिसीला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. पंचगंगा प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल असून, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी याबाबतची वस्तुस्थिती समोर यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार महसूल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली होती.

कोल्हापूर, इचलकरंजीसह करवीर, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यात ज्या ठिकाणी सांडपाणी थेट नदीत मिसळते त्या ठिकाणी भेटी देऊन पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्याच्या आधारेच जलप्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ च्या कलम ३३ नुसार या नोटिसा काढण्यात आल्या आहेत.