इचलकरंजीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्नशील ; मंत्री हसन मुश्रीफ

सध्या इचलकरंजी म्हणजेच वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात अनेक विकासकामांचा शुभारंभ सुरु आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या दूर होण्यास मदत होऊ लागली आहे. शिक्षण, आरोग्य याबाबतीत अनेक सेवासुविधा करण्यासाठी प्रयत्न सातत्याने सुरु आहेत. शाहू महाराजांच्या नावे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी दिग्विजय खानविलकर यांनी खूप परिश्रम घेतले. आता इचलकरंजीतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले.

सीपीआरमधील नूतनीकरण वार्ड, आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्सच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मुश्रीफ म्हणाले, मी या खात्याचा कार्यभार घेण्याआधी सीपीआरला यायचो. तेव्हा रस्त्यावरून घाण पाणी व्हायचे. खोल्यांमध्ये अंधार होता. रुग्णांचे नातेवाईक कुठेही झोपायचे. सीपीआर हे अनेक समस्यांनी ग्रासले होते. म्हणूनच खात्याचा मंत्री झाल्यानंतर चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. माेरे यांनी स्वागत केले. तर कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांनी उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिशिर मिरगुंडे यांनी आभार मानले.