इचलकरंजी शहरातील खंजिरे औद्योगिक वसाहतीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. कारखान्यात चोरी करणाऱ्या सहा जणांना शहापूर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरज महादेव पाटील, गणेश सुरेश आडेकर, शैलेश संभाजी कुंभार, राजू मारुती वडर, सद्दाम इसाक सुतार, ऋषिकेश बाबासाहेब पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शहापूर औद्योगिक वसाहतीत मनोज शिवाजी लोखंडे यांचे “वर्षा इंडस्ट्रीज” नावाचे वर्कशॉप आहे. दिनांक १४ मार्च रोजी या कारखान्यातून १ लाख १२ हजार रुपयांचे व्हीएमसी मशिनचे आऊटर रेसचे ५६ नग चोरीला गेले होते.या प्रकरणी लोखंडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेला माल विक्रीसाठी काही संशयित येणार आहेत.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेतले.चौकशीअंती त्यांनी चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ५६ नग चोरी केलेला माल, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (क्रमांक एमएच ०७ एस ५४२३) आणि दुचाकी (क्रमांक एमएच ०९ एफएम ०८५६) असा एकूण २ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहापूर पोलिसांनी वेगवान तपास करून चोरीचा छडा लावल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे.