स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट झाल्याने राजकीय भुवया उंचावल्या गेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या चर्चेदरम्यानच माजी आमदार महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांची भेट झाल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्यानंतर उभय नेत्यांची भेट संजय घोडावत महाविद्यालयात झाली. यावेळी दोघांमध्ये राजकीय चर्चा झाली.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चा सुरू आहे. या मतदारसंघांमधून राजू शेट्टी यांची एक ला चलो रे भूमिका कायम असली तरी त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने असणार की आणि अन्य उमेदवार असणार? याची चर्चा अजूनही सुरूच आहे. शिंदे गटामध्ये गेलेले खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधामध्ये मतदारसंघांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यांना या नाराजीचा सामना सुद्धा करावा लागला आहे.
अलीकडेच इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा माने यांच्या कार्यशालीवर जाहीरपणे टीका केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने हेच उमेदवार असले तरी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार महाडिक आणि राजू शेट्टी यांची झालेली भेट राजकीय भूवया उंचावणारी आहे.