महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती!

इचलकरंजी महानगरपालिका शहरातील कचरा उठाव करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयेहून अधिक रक्कम प्रत्येक वर्षाला खर्च करते. शहरातील कचरा उचलण्याचे काम शहरातील ठेकेदार चांगल्या पद्धतीने न केल्यामुळे इतर जिल्ह्यातील ठेकेदारांना कचरा उचलण्याचे काम देण्यात आले. मात्र, तरीही शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शहरातील कोणत्याही भागात गेले तरी कचऱ्याचे ढीग हमखास दिसत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील आरोग्य बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लावल्यास नागरिकांना दवाखान्याचे उंबरे झिजवावे लागणार आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे बाजूला राहिले कचरा उठाव आणि त्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ओला कचरा आणि सुका कचरा सुद्धा नागरिक गोळा करून देण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यासाठी आवश्यक महानगर पालिकेने नागरिकांचे प्रबोधन केलेले नाही. प्रसंगी ओला व सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणे गरजेचे आहे.