सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. निवडणुकीच्या कामकाजाची प्रक्रिया गतीने सुरू असतानाच इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व तैमूर मुल्लानी यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जारी केलेले आहे.
परंतु नेमकी त्यांची बदली कोणत्या ठिकाणी केली आहे हे अद्यापही समजले नाही त्याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांमध्ये निघण्याची शक्यता आहे.रिक्त दोन पदावर कोणाच्याही नियुक्तीचे आदेश निघालेले नाहीत. इचलकरंजी नगरपरिषद अस्तित्वात असताना ठेंगल हे मुख्याधिकारी पदावर रुजू झाले होते. त्यानंतर सभागृहाची मुदत संपल्यानंतर प्रशासक पदाचा कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला.
मात्र नगरपरिषदेचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर त्यांच्या पदनामावलीत बदल झाला. मुख्याधिकारी तथा प्रशासक ऐवजी उपायुक्त अशी त्यांच्यावर जबाबदारी पडली. जयसिंगपूरमधील मुल्लानी यांची इचलकरंजी महापालिकेकडे उपायुक्त पदावर नियुक्ती झाली होती. गेल्या आठ महिन्यांपासून ते इचलकरंजी महापालिकेकडे कार्यरत आहेत.