महायुतीमध्ये टेन्शन!वाढली डोकेदुखी

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून चार जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघासह करवीर आणि हातकणंगले मतदारसंघावर दावा केला आहे. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सुद्धा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याच पक्षाकडून शड्डू ठोकला आहे.

सहयोगी आमदारांनी केलेल्या दाव्याने महायुतीला या जागांवर उमेदवार देताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विद्यमान उमेदवारांना पाठिंबा निश्चित केल्यास इच्छुकांना सुद्धा सांभाळण्याचं काम करावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सहयोगी आमदारांनी घेतलेल्या भूमिकेनं चांगलीच कसरत होण्याची शक्यता आहे. भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने इचलकरंजीतून राहुल आवाडे व हातकणंगलेतून जयश्री कुरणे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे.

जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे भाजपचे सहयोगी आमदार आहेत. ते स्वतः पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिगणात असतील. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सरुडकर असतील.

विनय कोरे यांनी जनसुराज्यकडून करवीर मतदारसंघातून संताजी घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके इच्छूक आहेत. त्यामुळे आवाडे आणि कोरे यांनी जाहीर केलेल्या उमेदवारानंतर आता यड्रावकर यांचाही पक्ष आल्याने आणखी एका मतदारसंंघात डोकेदुखी वाढली आहे.