वाळवा पंचायत समितीसमोर कासेगाव ग्रामस्थांचा ठिय्या……

कासेगाव येथील गावठाणातील जागा नावावर कराव्यात, या मागणीसाठी ग्रामस्थांनी श्रमिक मुक्ती दलाचे नेते कॉ. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली येथील वाळवा पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन केले.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. आज (मंगळवारी) याबाबत प्रांताधिकार्‍यांशी बैठक होणार आहे. रहिवाशांनी ग्रामविकास, महसूल विभागाला निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शासनाच्या नावे उतारे निघत आहेत.

घरे, जागा नावावर व्हावीत यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.इस्लामपूर येथे डॉ. पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयावर धडकले.

त्यांनी पंचायत समितीसमोर मंडप घालून तेथे ठिय्या मारला. दुपारी डॉ. पाटणकर, शिष्टमंडळ, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची बैठक झाली.

गटविकास अधिकार्‍यांनी प्रांताधिकार्‍यांशी मंगळवारी बैठक घेऊन लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले. कॉ. जयंत निकम, सुमेध माने, संदीप धुमाळ, योगेंद्र पाटसुते, राजेंद्र पाटसुते, नामदेव पाटसुते, बाबुराव माने, हंबीरराव पाटसुते, विजय भिंगारदेवे, वसंत माने, प्रियांका पाटसुते, अंजना मिसाळ, सुनीता हेगडे, रूपाली माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.