आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मनोज जरांगे पाटील यांनी शेवटचं हत्यार उपसलं आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही.मात्र, आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर मी विधानसभेच्या 288 जागा लढवणार आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांच्या या मोठ्या घोषणेमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी निवडणूक लढणार आहे. राज्यातील 288 जागांवर उमेदवार देणार आहे, असं सांगतानाच लोकसभेच्या निवडणुकीत एक झालं. मराठा एक झाला. मोदींना गोधड्या घेऊन महाराष्ट्रात यावं लागलं. चार पाच नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.