करिअरच्या टप्प्यावरील महत्त्वाचे वर्ष असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यामुळे आता लवकरच विविध विद्याशाखांच्या प्रवेशप्रक्रिया सुरू होतील. त्यामध्ये बारावीचे विद्यार्थी आणि पालक व्यग्र होतील.बारावीनंतर पुढे काय करायचे? हे काही विद्यार्थ्यांचे खूप आधीपासून ठरलेले असते, तर काही जण सुट्टीत ठरवतात.
बारावीनंतर इंजिनिअर, डॉक्टर, वकील, सीए होण्याऐवजी नवीन काही तरी करण्याकडे आता विद्यार्थांचा कल आहे. ज्या अभ्यासक्रमातून काही तरी नवीन शिकण्याचे समाधान मिळेल आणि पुढे जाऊन उज्ज्वल करिअरही घडेल अशा करिअरची निवड करण्यावर सध्या विद्यार्थ्यांचा भर आहे. करिअरच्या काही नवीन पर्यायांची माहिती खाली थोडक्यात दिली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित उपयोग होईल –
निमवैद्यकीय क्षेत्रात
(पॅरामेडिकल) काम करू इच्छिणाऱ्यांसाठीदेखील विविध पर्याय उपलब्ध आहेत. नीट किंवा एमच-सीईटीसारखी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी बीएससी नर्सिंग, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बी. फार्म, बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी (बीएमएलटी), बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, बॅचलर ऑफ रेडिएशन टेक्नॉलॉजी (बी.आर.टी.), बॅचलर ऑफ स्पीच, लँग्वेज अँड हिअरिंग सायन्स, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन मेडिकल रेडिओलॉजिक टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स इन परफ्युजन टेक्नॉलॉजी यांसारख्या अभ्यासक्रमांतून पदवीधर होऊ शकतात.
पदविका
निमवैद्यकीय क्षेत्रातील मेडिकल इमॅजिंग टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, मेडिकल लॅबरोटरी टेक्नॉलॉजी, डायलेसिस टेक्नॉलॉजी, एक्स-रे टेक्नॉलॉजी, ऑप्थेमेलिक टेक्नॉलॉजी, फार्मसी, डेन्टल हायजिन, डेन्टल मेकॅनिक्स या विषयांमध्ये पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमही करू शकतात.