सोलापूरात एकाच दिवशी २५० कर्मचारी निवृत्त….

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणा-या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सेवेतून येत्या ३१ मे रोजी सुमारे २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संबंधित कर्मचा-यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यासाठी सुट्टीतही विशेष शिबीर आयोजिले आहे.

जि. प. च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या मदतीने आयोजिलेल्या या विशेष शिबिरात निवृत्त कर्मचा-यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे.

जुन्या काळात अधिकृत जन्मदाखला नसलेल्या मुलांना शाळेत दाखल करताना तेथील शिक्षकांकडून शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवसाची १ जून हीच तारीख मुलांच्या जन्म तारीख म्हणून नोंद केली जात असे. गुरूजींनी नोंद केलेली विद्यार्थ्यांची १ जून ही जन्मतारीख अद्यापपर्यंत चालत आली आहे. हीच जन्मतारीख घेऊन शासकीय-निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले असे अनेक अधिकारी व कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होतात. जिल्हा परिषदेत ३१ मे रोजी एकाच दिवशी असे विविध विभागातील सुमारे अडीचशे कर्मचारी निवृत्त होत आहेत. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी त्यांच्या सेवेचे सर्व लाभ द्यावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत.