खानापुरात पोल्ट्री व्यावसायिकांची धडपड…..

वाढत्या उष्णतेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना फटका खानापूर घाटमाथ्याला वळवाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला असून तापमान ४० अंशांच्या वर जाऊ लागले आहे. याचा फटका परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांना बसू लागला आहे.घाटमाथ्यावरील सुलतानगादे व बेनापूरमधील काही युवकांनी नोकरीच्या मागे न लागता पोल्ट्री व्यवसायाचा मार्ग निवडला आहे.

खानापूर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्या वाचविण्यासाठी वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये उष्णता सहन होत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना पोल्ट्रीतील वातावरण थंड ठेवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत, त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावरील खर्चाचा बोजा वाढत आहे. उन्हाळ्यात पोल्ट्री व्यवसायाला उन्हाचा फटका बसतो. तापमान वाढीमुळे पक्ष्यांची मर मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे उन्हाळ्यात हा व्यवसाय बंद ठेवला जातो.

आम्ही मात्र या वर्षी उन्हाळ्यातसुद्धा पक्षी भरले आहेत. शेडमधील तापमान थंड राखण्यासाठी आम्ही फॉगर व स्प्रिंकलर यांचा वापर करत आहेत. अति उष्णतेमुळे कोंबड्या मृत्युमुखी पडू नयेत म्हणून पोल्ट्रीभोवती झाडे लावून वातावरणात गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु अति उष्णतेपुढे हे उपायही तोकडे पडू लागले आहेत. तसेच शेडवर स्प्रिंकलरच्या साहाय्याने गारवा निर्माण केला जातो. त्यामुळे वीजबिल वाढीचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसणार आहे.