भाजपला निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाली असेल, तर दुष्काळाकडे लक्ष द्यावे .मागीलवर्षी पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसणार हे आम्ही विरोधक म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सांगत आलो आहे. मात्र देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाली तर याकडे लक्ष दिले जाईल ना, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्यावर सरकारचं लक्ष वेधल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारला चांगलंच सुनावलं दुष्काळ जाहीर केला होता. मात्र निवडणुकीचा मोडमधून सरकार बाहेर पडले असेल तर त्यांनी थोडे इकडे लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.
वाळवा तालुक्यातील संपर्क दौऱ्यावेळी आ. पाटील बोलत होते. राज्यातील एकूण १९ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांत गंभीर व १६ तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. राज्यातील एकूण २२९२ महसुली मंडलांपैकी १५३२ महसुली मंडलात राज्यातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आला आहे. राज्यातील धरणांमध्ये १०-२० टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. उजनीत ०.० टक्के पाणीसाठा आहे, तर जायकवाडीत ५.६५ टक्के आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे, भंडारदरामध्ये फक्त ९ टक्के पाणी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सरकार पाण्याचे टँकरही उपलब्ध करत नाही. जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देत नाही. मागे मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.