हातकणंगलेत मतदानाची टक्केवारी काय सूचित करते!

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. यंदा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली.अत्यंत इर्षेने झालेल्या या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.15%? मतदान झाले तर हातकणंगलेमध्ये 69% मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार हे चार जून रोजी कळणार आहे.

मात्र, लोकसभेच्या आडून कोणी कोणाचा गेम केला याची चर्चा सध्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड आणि राधानगरी लोकसभा मतदारसंघात याबाबत अनेक चर्चा आहेत. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इचलकरंजी आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड, करवीर या विधानसभा मतदारसंघांत 2019 च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे.

ही वाढलेली मतदानाची टक्केवारी काय सूचित करते याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवाय स्थानिक राजकीय संदर्भ देत अनेक राजकीय चर्चेला उकळ्या फुटल्या आहेत. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाची १.३२ टक्क्यांची वाढ आहे. शिरोळमध्ये १.६०, तर इस्लामपूरमध्ये ३.४३ टक्के वाढ आहे. इचलकरंजीमध्येही मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाचा फायदा करून देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. इस्लामपूरमध्ये महायुतीमधील नेत्यामध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सूरू असलेली चुरस चर्चेचा विषय ठरत आहे.इचलकरंजी मतदारसंघात आमदार प्रकाश आवाडे आणि धैर्यशील माने यांच्याबाबत सुरवातीला असलेली नाराजी भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर आवाडे यांनी घेतलेली भूमिका लोकांना न पटलेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे.