जिथं विकास तिथं धैर्यशील!

आगामी लोकसभा निवडणुकीत मला उमेदवारी आणि विजयाची 100 टक्के खात्री आहे. सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण करणारा मी लोकप्रतिनिधी आहे, मी माझा मार्ग सोडून कुठल्याही मार्गाला या ठिकाणी जात नाही. माझा फोकस काम माझ्या मतदारसंघाचा विकास आहे, हे करत असताना कोरोनामुळे काही ठिकाणी संपर्काला मर्यादा आल्या होत्या, अशी प्रतिक्रिया  हातकणंगले खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघातून गायब असल्याच्या आरोपांवर दिली.

ते म्हणाले की, खासदाराला घरबसल्या कोणी निधी आणून देत नाही. त्याला 288 आमदारांकडून निधी आणावा लागतो. 48 खासदारांमधून पण आणावा लागतो. देशातील 500 पेक्षा जास्त खासदारांमधून आपल्याला योजना आणाव्या लागतात. त्यामुळे 365 दिवसांपैकी 150 दिवस अधिवेशन चालू असतं. खासदाराचं मल्टी टास्किंगचं काम असत आणि हजारो गाव त्याच्या मतदारसंघांमध्ये असतात. कामाच्या रूपाने त्या गावागावांमध्ये पोचण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली काम आणि गेल्या दोन वर्षांमध्ये झालेली काम याचा ग्राफ जर डोळ्यासमोर ठेवला तर धैर्यशील मानेनं काय काम केलं आणि कसं उभं केलंय याचा आपल्याला अंदाज येईल, असा दावा त्यांनी केला.  

त्यांनी सांगितले की, गावातील पाणीपुरवठा योजनेवर धैर्यशील आहे, धैर्यशील माने गावाला जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये आहे.  धैर्यशील माने नॅशनल हायवेमध्ये आहे, धैर्यशील माने एमआयडीसीमध्ये आहे, जिथे जिथे विकास आहे तिथे तिथे तुम्हाला धैर्यशील माने दिसेल. ज्या 10 वर्षांमध्ये कधीही झाला नव्हता एवढा विकास एक खासदार म्हणून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. काही विरोधक अशा पद्धतीचे अपप्रचार आणि नॅरेटीव्ह सेट करायचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. 

जागावाटपावर धैर्यशील माने म्हणाले की, आम्ही  22 जागा लढवल्या होत्या, त्यामधील 18 जागा निवडून आल्या. आज 13 खासदार हे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करत आहेत. उर्वरित पाच जागांवर सुद्धा शिवसेनेचाच अधिकार आहे, कारण तिथेही चिन्हावर निवडून आलेले आणि शिवसेना पक्षावर निवडून आलेले खासदार आहेत. महायुतीचे नवीन कॉम्बिनेशन फर्मेंटेशन तयार होईल. राष्ट्रवादी आमच्यामध्ये सामील झाला आहे. तिन्ही अलायन्सचे मेंबर कत्र बसतील त्यावेळी फॉर्म्युला सेट होईल, पण मला कोणतीही चिंता वाटत नाही. या सगळ्या फॉर्म्युलामध्ये सन्मानजनक तोडगा हे सगळे जण एकमेकांच्या अंडरस्टँडिंगने काढतील.