लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचे मतदान झाले. कोल्हापूरचे मतदान ७१.५९ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघाचे मतदान ७१.११ टक्के झाले. त्यानंतर मतदानयंत्रे सुरक्षेच्या गराड्यात मतमोजणी केंद्रावर आणण्यात आली. लोकसभा मतदारसंघाची मतमोजमी रमणमळा येथील धान्य गोदामात होणार आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे. चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तेथे उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांना बसण्यासाठी मांडव उभारण्यात आले आहेत. तसेच बैठक व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी जाळ्या उभारून वेगवेगळे विभाग करण्यात आले असून, प्रत्यक्ष मतमोजणीचे टेबल ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राभोवती पत्र्याचे कुंपण उभारण्यात आले असून, कोणतीही व्यक्ती आतमध्ये जाऊ शकत नाही, अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.