कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणार्या ३१९ भाविकांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुविधा अॅपची निर्मिती केली आहे, अशी माहिती राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी येथे दिली. मुस्लिम धर्मियामध्ये हज यात्रेला विशेष महत्त्व आहे. ही यात्रा पवित्र असल्याची भाविकांमध्ये धारणा आहे. तथापि हजमध्ये गेल्यानंतर भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी हज कमिटीचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे याची माहिती देण्यासाठी हज कमिटीचे कोल्हापुरी पदाधिकारी कोल्हापूर येथे आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी ३१९ मुस्लिम भाविक हजयात्रेला जाणार आहेत.
या यात्रेकरूंना हज प्रवासादरम्यान आणि यात्राकाळात करावयाच्या विधीबाबत मार्गदर्शन करण्यात येते. लिम्रास फौंडेशन आणि हज फौंडेशन यांच्यावतीने आज या भाविकांना सीपीआरमध्ये लसीकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम झाला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकाने लसीकरण केले. त्यानंतर मुस्लिम बोर्डींगमध्ये हज यात्रेकरूंना मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान राज्य हज कमिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी या शिबिराला भेट देवून भाविकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील २७ हजार भाविकांनी हजयात्रेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे २० हजार यात्रेकरूंची निवड कमिटीमार्फत झाली आहे. हे यात्रेकरू दोन ते सहा जून या कालावधीत मुंबईवरून हजयात्रेसाठी रवाना होतील.