विट्यात सिग्नल यंत्रणा ठरतेय कुचकामी….

सध्या विटा शहरात मोठी वर्दळ आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने शिवाजी चौक ते क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा व तेथून पुढे नेवरी नाक्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, तर त्याच्याबाहेर चारचाकी वाहनांचे पार्किंग होते. उर्वरित अपुऱ्या राहिलेल्या रस्त्यावरून वाहने सुरक्षितरीत्या जात नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात तर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते.

वाहतूक पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे केला. शहरात रस्ता दुभाजक करून शिवाजी चौकात सिग्नल उभे केले. परंतु, विटेकर नागरिक व वाहनचालक या यंत्रणेचे औटघटकेचे साक्षीदार ठरते. गेल्या सहा ते सात वर्षांपासून हे सिग्नल बंद आहेत. याबाबत जागरूक नागरिक व वाहनधारकांनी आवाज उठविला. यानंतर दुसऱ्याच दिवशी ही यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, काही दिवसांत पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने ही यंत्रणा अद्याप बंद आहे. परिणामी, या सिग्नलमधील लाल, पिवळा व हिरवा दिवा गेल्या सहा ते सात वर्षांपासून विटेकर नागरिकांना दिसलेला नाही.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरत आहे. विटा शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यास वाहतूक पोलिसांना पूर्णपणे अपयश आले आहे. मोठ्या दिमाखात उभारलेली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल यंत्रणा कुचकामी ठरली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गेल्या सहा ते सात वर्षांपासून ही यंत्रणा धूळ खात पडून आहे. याकडे पोलिसांसह नगरपालिकेचेही दुर्लक्ष आहे. परिणामी, वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विटा पोलिस व नगरपालिका प्रशासनाने शहरातील या बंद पडलेल्या सिग्नल यंत्रणेचा तांत्रिक बिघाड दूर करून ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांतून होत आहे.