कालवा समितीच्या बैठकीत टेंभू योजना ३० जूनपर्यंत चालू राहणार असा निर्णय; आ. सुहास बाबर

मुंबई विधानभवनात राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टेंभू उपसा सिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसासिंचन योजना, ताकारी उपसा सिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समिती पार पडली. या बैठकीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजना ३० जून पर्यंत चालू ठेवण्याचे सूचना मंत्री महोदयांनी दिल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली. आमदार सुहास बाबर म्हणाले, आज मंगळवारी आज पार पडलेल्या टेंभू उपसासिंचन योजना, आरफळ योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, ताकारी उपसासिंचन योजना नियोजनाबाबतची कालवा सल्लागार समितीची बैठक जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे पार पडली.

या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार ना. विखे पाटील यांनी टेंभू योजनेतील नादुरुस्त झालेला ट्रान्सफॉर्म (रोहित्र) तातडीने बदलून आवर्तन बंद पडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी टेंभू योजनेचे जुने झालेले पंप बदलण्याबाबत चर्चा झाली तसेच राजेवाडी तलावातील पाणी तातडीने कटफळ तलावात सोडून उंबरगाव, पुजारवाडी, पांढरेवाडी इ भागात निर्माण झालेली पाणी टंचाईवर मात करता येईल अशी सुचना करण्यात आली. यावर राजेवाडी उजवा कालवा तसेच राजेवाडी तलावात जिहे कठापुर तसेच उरमोडी योजनेतून पाणी सोडण्याबाबत चर्चा करण्यात झाली आणि यावर वेगळी बैठक घेण्यात येईल असे ना. विखे पाटील यांनी सांगीतले