अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानींची मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अंतर्गत येणारे अनेक व्यवसाय देशांतर्गत शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज आहेत. आगामी काळात मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील अनेक कंपन्या बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत असून समूहाच्या दूरसंचार आणि किरकोळ व्यवसायांच्या सूचीबाबत बऱ्याच काळापासून चर्चा आणि अटकळ सुरू आहेत.
रिलायन्स ग्रुपचा कोणता व्यवसाय आधी सार्वजनिकरित्या लिस्ट होईल असा प्रश्न लोकांच्या मनात असून या संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.हिंदू बिझनेसलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, रिलायन्स जिओ इन्फोकॉमला आयपीओद्वारे सार्वजनिक बाजारात प्रथम लिस्ट केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, इंग्रजी वृत्तपत्रानेही सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केले असून कंपनीकडून अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
मुकेश अंबानींच्या आवडत्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओचा आयपीओ लवकरच येण्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून हा आयपीओ देशातील सर्वात मोठा असू शकतो ज्याचे मूल्यांकन १०० अब्ज डॉलर्स असू शकते. सध्याच्या बाजारातील चर्चांवर ह्युंदाईचा आगामी आयपीओ आतापर्यंत जाहीर केलेला सर्वात मोठा IPO मानला जात आहे, ज्याचा आकार टेन अब्ज डॉलर्स म्हणजेच २५ हजार कोटी रुपये आहे.