अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. तसेच मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. परंतु खानापूर तालुका अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. खानापूर घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून जोराचा वारा, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट यामुळे वळिवाच्या पावसाचे वातावरण तयार होत आहे, परंतु जोराचा पाऊस न येता रिमझिम पाऊस पडत असल्याने बळीराजाची निराशा झाली आहे.
सर्वांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. वळीव पावसाच्या हुलकावणीने तापमानात प्रचंड वाढ झाली असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. दमदार पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण पावसाची वाट पाहत आहेत. पेरणीचे दिवस जवळ येऊ लागल्याने शेतकऱ्यांची कामे पूर्ण करण्याची लगबग दिसून येत आहे. परंतु पावसाअभावी शेतातील कामांना गती येईनाशी झाली आहे.