इचलकरंजीत सावकारीचा विळखा! कारवाईची गरज

इचलकरंजीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून नियुक्त केलेल्या एजंटांकडून महिलांचे गट तयार करून कमिशन घेऊन त्यांना कर्ज मिळवून दिले जात आहे. याच एजंटाकडून पुन्हा वसुलीसाठी तगादा लावला जातो. हप्ता थकल्यास पुन्हा ३० ते ४० टक्के दराने पैसे उपलब्ध करून दिले जातात. या तगाद्यामुळे काही महिलांनी यापूर्वी जीवनयात्रा संपवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या नावावर एजंटगीरी करून दहशत माजवणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

इचलकरंजी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्सच्या आड छुप्या वाढीव व्याजदराच्या वसुलीतून सावकारी फोफावत चालली आहे. वसुलीसाठी अर्थपुरवठा करणाऱ्या खाजगी फायनान्स कंपन्या त्यांचे एजंट आदींसह अर्थपुरवठा करणाऱ्यांकडून तगादा लावून आर्थिक शोषण केले जात आहे. सहज कर्ज उपलब्ध झाल्यानंतर छुप्या व्याजदराच्या वसुलीमुळे हा सावकारीचा विळखा घट्ट होत असून विशेषतः महिलांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.