खानापूरमध्ये लोकसभा निकालानंतर समीकरणे बदलणार…

लोकसभा निवडणुकीचा निकाल हा मंगळवारी म्हणजेच 04 जूनला होणार आहे. त्याआधीच विधानसभा निवडणुकीच्या तयारीमध्ये अनेक नेत्यांनी आपली हालचाल सुरू केल्याचे चित्र अलीकडे दिसत आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये दुरंगी की तिरंगी सामना होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.

मतदारसंघात महायुतीच्या तिन्ही पक्षात विधानसभेच्या निवडणुकीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आटपाडी तालुक्यातील राजकीय नेत्यांच्या काय भूमिका असणारे हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. आटपाडी तालुक्यात महायुतीच्या तिन्ही गटातच राजकीय हाडवैर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनीही विधानसभेला निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. जुन्या नव्याची मोट बांधत भाजपाच्या अन्य नेते मंडळींशी देखील ते सलगी राखून आहेत. दिवंगत आमदार अनिल बाबर, अमरसिंह देशमुख व तानाजी पाटील हे अनेक कार्यक्रमात एकत्र दिसले होते. अनिल बाबर यांच्या निधनानंतर ही सुहास बाबर यांच्या समवेत अमरसिंह देशमुख यांनी आपला एकोपा ठेवला असल्याचे दिसून आले आहे. मात्र असे असले तरी तानाजी पाटील व अमरसिंह देशमुख यांच्यामध्ये दिलजमाई होणार का? हा प्रश्न दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.