अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये संजय काका पाटील यांचा पराभव केला. यानंतर विशाल दादा पाटील यांनी आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठांची भेट घेऊन महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला. मात्र काल शनिवारी आटपाडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार विशाल दादा पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहासभैया बाबर यांना जाहीर पाठिंबा देत जिल्हाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
एकीकडे खासदार विशाल दादा पाटील यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असताना खानापूर मतदारसंघात मात्र विशाल पाटील यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. खासदार विशाल दादा पाटील यांच्या शिंदे गटाला दिलेल्या जाहीर पाठिंब्या नंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजयबापू विभुते यांनी विशाल पाटील यांचा सडकून समाचार घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
विभुते म्हणाले, काँग्रेसकडून मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला जाणार असेल, तर जिल्ह्यात महाविकास आघाडी न करणेच योग्य ठरेल. महाविकास आघाडीतील विश्वासाला तडा देण्याचे काम खासदार पाटील करीत आहेत. पाटील यांचे खायचे व
दाखवायचे दात वेगळे आहेत. काँग्रेसने मिंधे गटाला जाहीर पाठिंबा द्यावा. लोकसभेला जिल्ह्यात मविआतील उद्धवसेनेचा विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. विधानसभेलाही काँग्रेसकडून विश्वासघातच होणार असल्याचे संकेत खासदार पाटील यांनी दिलेत.