इचलकरंजीत गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झालेली पहायला मिळतच आहे अशातच चोरीच्या प्रमाणात देखील भयंकर वाढ झालेली आहे. अशाच एका बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. भरवस्तीतील वेताळ पेठ परिसरातील बंद घर फोडून चोरटयांनी डल्ला मारला. चोरट्यांनी १ लाख ३० हजाराची रोकड आणि खानावळीसाठी लागणारे जेवणाचे ३० डबे यासह १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
भरवस्तीमध्ये झालेल्या या चोरीमुळे चोरटा माहितीगार असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, येथील वेताळ पेठ परिसरात राहणारे इब्राहिम मोमीन यांची घरगुती खानावळ असून त्यांच्या मुलाचं लग्न झाल्यावर मोमीन कुटुंबीय परगावी गेले आहेत. त्यामुळे ४ दिवसांपासून त्यांचे घर कुलूप बंद होते. या तीनमजली घरात चोरट्यांनी बुधवारी रात्री मुख्य दरवाजाला भगदाड पाडून आतून कडी तोडून दुसऱ्या मजल्यावर प्रवेश केला.
या ठिकाणीही २ कपाटांचे लॉक न तोडता दरवाजाखालून कोयंडा घालून कपाट उघडली. त्यापैकी एका कपाटातून रोख १ लाख ३० हजार रुपये चोरट्यांच्या हाती लागले. त्यानंतर चोरट्यांनी तिसरा मजला गाठला पण त्या ठिकाणी मौल्यवान असे त्यांच्या हाती काही लागले नाही. जाता जाता चोरट्यांनी पोत्यात भरलेले जेवणाचे ३० डबे लंपास केले. गुरूवारी सकाळी शेजारच्यांना त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी मोमीन यांच्याशी संपर्क साधला.
त्यामुळे मोमीन कुटुंबियांनी घरी येऊन पाहणी केली असता रोख १ लाख ३० हजार रुपये आणि जेवणाचे डबे सुमारे दिड लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.