सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून जगजाहीर आहेच. पाण्यासाठी नागरिकांचे खूपच हाल होतांत. किडबिसरीत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वाड्यांना वर्षानुवर्षे पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींचे पाणी कडक उन्हामुळे संपुष्टात येते. तेव्हापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शासनाकडून काही भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी पाण्याची तहान भागली जात नाही. पाण्यासाठी लोकांची होणारी वणवण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून जलजीवन मिशन योजना मंजूर करण्यात आली.
पण सांगोला तालुक्यातील किडबिसरी परिसरात जलजीवन मिशन योजनेचे काम कासव गतीने सुरू असून, कामासाठी दिलेली मुदत संपून चार महिने उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. कामाचा निकृष्ट दर्जा ठेकेदाराचा वेळकाढूपणा पाठीशी घालणाऱ्या संबंधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे गावावर कृत्रिम तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. यास जबाबदार ठेकेदाराचा काळ्या यादीत समावेश करावा, अशी मागणी किडबिसरी ग्रामस्थांनी केली आहे. शासनाने लाखो रुपये खर्चून जल जीवन योजना राबवली जात असूनही टेपे वस्ती वरील मदत संपूनही पाण्याच्या टाकीचे काम अजून अपूर्ण आहे पाईपलाईनचे काम झालेच नाही अशी गंभीर परिस्थिती आहे.
दर्जा निकृष्ट असल्याने पाणी योजना सुरू होण्यापूर्वीच काम थांबलेले आहे तसेच या छोट्या वाड्यांना परवडणारी नाही, काही ठिकाणी एक फूट खोलवरदेखील पाइपलाइन जमिनीत पुरलेली नाही. नुसत्या चारी खोदून ठेवले आहेत. ठेकेदाराकडून काम सुरू असताना संबंधित विभागाकडून डोळेझाक का करण्यात आली? पाहणी केली असेल तर संबंधित ठेकेदाराला पाठीशी का घातले गेले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.