विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला त्यानंतर सांगोला शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिकमहूद ता.सांगोला येथील निवासस्थानी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेवून पराभवाच्या कारणांची मीमांसा केली. पाच वर्ष एकत्रित काम केलं आणि निवडणुकीपूर्वी अचानक आम्ही दोघे वेगवेगळे झाल्यामुळे आपली माणसं विस्कळीत झाली , मत विभागणीचा नाही तर दीपकआबाला एकत्र घेऊन कारभार केल्याचा मला निवडणूकीत फटका बसल्याचे शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना शहाजीबापू म्हणाले, मी 8 निवडणुका लढलो त्यापैकी दोन जिंकल्या आणि सहा हरलो. राजकारणात जय- पराजय होत असतो. आपल्याला दीपकआबाचा फटका बसला नाही तर त्यांना एकत्रित येऊन कारभार केल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये आणि मीही पराभवामुळे खचून गेलो नाही उलट नेटाने कामाला लागतो मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडून काहीतरी पदरात पाडून घेऊन सर्वजण मिळून पुन्हा जोमाने कामाला लागू असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी शहाजीबापूंच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.