पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड इंडस्ट्रीज ही सांगाव ग्रामपंचायतीकडे घरफाळा गेल्या १८ वर्षांपासून भरत होती. पण, तळंदगे ग्रामपंचायत सरपंच संदीप पोळ व सदस्य यांनी सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांपूर्वी याबाबतची सर्व कागदपत्रे, नकाशे मुंबई, पुणे, औद्योगिक विकास महामंडळ, भूमी अभिलेख या ठिकाणी सादर करून रेमंड तळंदगे ग्रामपंचायत हद्दीमध्येच येते हे सिद्ध केले आहे. त्यामुळे इथून पुढे रेमंड कॉटन इंडस्ट्रीजचा कर तळंदगे ग्रामपंचायतीकडे जमा होणार आहे. हद्दीचा विषय निर्माण झाल्याने रेमंड कंपनीने मागील दोन वर्षांपासून फाळा भरला नव्हता.
आता निर्णय लागल्याने सन २०२३ ते २०२५ या दोन वर्षांचा साधारण ६४ लाख रुपये घरफाळा एमआयडीसीकडे जमा होणार आहे. यापैकी निम्मी रक्कम म्हणजे ३२ लाख रुपये तळंदगे ग्रामपंचायतीला मिळणार आहे, इथून पुढेही ही रक्कम दरवर्षी मिळत राहणार असल्याने, गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. सरपंच व सर्व सदस्यांनी याबाबत लढा देऊन यश संपादन केले म्हणून, सरपंच संदीप पोळ, सदस्या शुभांगी कांबळे, सविता चौगुले, आयेशा मुल्लाणी, अर्चना माळी, सुशांत शिंगाडे, वीरेंद्र वाघमोडे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी गुलाल व फटाके लावून आनंद उत्सव साजरा केला.
