हातकणंगलेत नवीन स्मशानभूमीचे काम अद्याप रखडलेलेच……

हातकणंगले शहरासाठी येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत रस्त्यालगत स्मशानभूमी आहे. मात्र, स्मशानभूमीचे (Cemetery Building) बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून चालू आहे. ठेकेदाराने काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने व कामात दिरंगाई झाल्याने अधिकाऱ्यांकडून काम थांबवण्यात आले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शेजारील ओढ्याच्या पात्रातच पेव्हिंग ब्लॉक बसवून उघड्यावरच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.पावसाळा तोंडावर असतानाही व कामाची मुदत संपूनही ठेकेदाराकडून कामाची पूर्तता झालेली नाही. झालेले कामही निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार हे उघड्यावरच करायचे का? असा सवाल आता शहरवासियांकडून विचारला जात आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर तरी नगरपंचायत प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. तर काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यत नगरपंचायत अधिकारी करतात तरी काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

दरम्यान, आता पावसाळा सुरू होण्यास अवघे काहीच दिवस बाकी आहेत. अशातच मृतदेहावर ओढ्याच्या पात्रातच अंत्यविधी चालू आहेत. पाऊस चालू झाल्यास मृतदेहावर अंत्यविधीसाठी अडचणी निर्माण होणार आहेत.