पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं गुढ आणखीनच वाढलं…..

आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2024) काही दिवस उरलेले असतानाच आता वैष्णवांना विठ्ठलभक्तीची ओढ पृथ्वीच्या या वैकुंठाला खुणावताना दिसत आहे.यंदाची आषाढी किंबहुना इथून पुढं सर्वच दिवस या मंदिरात येऊन विठुरायाचं रुप न्याहाळणं एक खास अनुभूती देऊन जाणार आहे. कारण जवळपास 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठलाच्या या सुरेख मंदिराचं मूळ स्वरुप नुकतंच समोर आलं आहे.

अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाचं काम युद्धपातळीवर सुरू असून नुकतंच मंदिर समितीनं या मंदिराची सुरेख झलक सर्वांपुढे आणली. मंदिर संवर्धनाच्या या कामात नव्यानं करण्यात आलेली सर्व बांधकामं काढत मंदिर पुरातन स्थितीत पुन्हा सर्वांसमोर आणलं जात आहे.

पंढरपूरातील मंदिराच्या गाभाऱ्यासमोर सोळ खांबीजवळील हनुमान दरवाजापाशी एक दगड खचलेला आढळला. तो दगड काढून पहिला असता त्या ठिकाणी एक तळघरवजा खोली आढळली. या तळघराच्या निमित्तानं पुरातन काळातील काही माहिती आणि रहस्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन घेऊन ज्यावेळी आपण हनुमान दरवाजातून बाहेर पडतो तेव्हा तिथं डाव्या हाताशी असणाऱ्या जागेत गुरुवारी मध्यरात्री काम करत असताना दोन खचलेले दगड आढळले. हे दगड हटवले असता तिथं खालच्या बाजूला जाणाऱ्या पायऱ्या आढळल्या, जिथं हे तळघर असल्याची शक्यता मंदिर प्रशासनाकडून वर्तवण्यात आली. हे तळघर त्या काळात कशासाठी वापरलं जात होतं, तिथं कोणत्या मूर्ती आहेत का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लवकरच या तळघरामुळं समोर येणार आहे.