हातकणंगले विधानसभा मतदारसंघात अशोकराव माने यांनी मारली बाजी…..

हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी २५ उमेदवारांपैकी ९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला होता.तर, १६ उमेदवार रिंगणात होते. मात्र, यापैकी आमदार राजू आवळे (काँग्रेस), माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (स्वाभिमानी शेतकरी संघटना) आणि महायुतीचे उमेदवार अशोकराव माने या उमेदवारांमध्येच तिरंगी लढत होती. आरक्षित मतदारसंघ असला तरीही जातीय समीकरणे या निवडणुकीत महत्वाची ठरली.

विधानसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी रिंगणात होती. यापैकी आमदार राजू आवळे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली विकासकामे आणि जनसंपर्काची शिदोरी घेऊन रिंगणात उतरले होते.तर, महायुतीतून जनसुराज्यचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने रिंगणात होते. २०१९ च्या पराभवानंतरही माने यांनी गेल्या पाच वर्षात मतदार संघातील संपर्क सोडलेला नाही.

प्रत्येक कार्यक्रम , सभा, समारंभातही त्यांनी हजेरी लावली. या संपर्काच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) , राष्ट्रवादी (अजित पवार) आणि जनसुराज्यची ताकद त्यांच्या सोबत होती.अखेरपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना सरते शेवटी शेतकरी संघटनेची साथ मिळाली.

आज विधानसभा निवडणूक निकालमध्ये महायुतीतून जनसुराज्यचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने यांनी आघाडी घेऊन हातकणंगले विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी मारलेली आहे.