मतमोजणीची तयारी पूर्ण, दुपारपर्यंत निकाल शक्य

लोकसभेच्या बहुचर्चित कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचे निकाल मंगळवारी (ता.४) स्पष्ट होणार आहेत. त्यासाठी मतदान मोजणी केंद्रे सज्ज असून, सुरक्षा यंत्रणाही तैनात आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण २८ टेबलवर मतमोजणी होईल. टपाली मतदानाची स्वतंत्र मोजणी होणार आहे. सकाळी आठला ही प्रक्रिया सुरू होणार असून, तीनपर्यंत दोन्ही मतदारसंघांचा निकाल स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात दुरंगी लढत आहे.

हातकणंगले मतदारसंघात सत्यजित पाटील (सरुडकर), राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. उद्या मंगळवारी (ता.४) दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी अनुक्रमे रमणमळा येथील धान्य गोदाम आणि राजाराम तलाव येथील जलसंपदा गोदाम येथे होणार आहे. यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली पूर्ण केली आहे.

सकाळी दहापर्यंत टपाली मतदानाचे निकाल हाती येतील. त्यानंतर विधानसभानिहाय फेऱ्यांना सुरुवात होईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मोजणीसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था आहे. तेथे चौदा टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, शिपाई आणि सूक्ष्म निरीक्षक असेल.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या आणि मतदानयंत्रातील मते यांची मोजणी केली जाणार आहे. संध्याकाळी सातपर्यंत अंतिम निकाल हाती येईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र दिले जाईल.