रामलिंग परिसर होणार प्लास्टिकमुक्त!

पावसाळ्यापूर्वी रामलिंग अलमप्रभू परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार रामलिंग नेचर क्लबतर्फे घेतला. संघटनेतर्फे आयोजित एक दिवसीय मेळाव्यामध्ये हा निर्णय घेतला. त्याचबरोबर रामलिंग नेचर क्लब सक्रिय करीत पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

रामलिंग नेचर क्लब ही संघटना हातकणंगले तालुक्यातील रामलिंग या क्षेत्राच्या निसर्ग संवर्धनासाठी कार्य करीत आहे. संघटनेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची चर्चा करण्यासाठी निसर्गप्रेमींचा मेळावा झाला. यावेळी ट्रेकिंगमध्ये संघटनेचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ऊर्मिला पाटील यांनी योगासन तसेच मार्गदर्शन केले. चर्चेमध्ये प्रा. डॉ. अमर कांबळे, राजू गोरे, संदीप गुदले, आदींनी मनोगत व्यक्त केले. रामलिंग परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा असून, तो पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्‍यात आला. पावसाळ्यात वृक्ष दत्तक योजनेच्या माध्यमातून अल्लमप्रभू येथे वृक्षारोपणाचा निर्णय झाला. प्रास्ताविक रामलिंग नेचर क्लबचे प्रवक्ते संतोष वडेर यांनी केले.