Janhvi Kapoor : सोलापुरातील जान्हवी कपूरच्या चाहत्याने तीन दिवस केले थिएटर बुक…

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अभिनेता राजकुमार राव  यांचा ‘मिस्टर अॅण्ड मिसेस माही’ (Mister And Misses Mahi) हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जान्हवी कपूर आता आपल्या एका चाहत्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी कपूरच्या चाहत्यांनी तब्बल तीन दिवस थिएटर बुक केले आहे. मिस्टर अॅण्ड मिसेस माही हा चित्रपट लोकांना मोफत दाखवण्यात येणार आहे. 

दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी असलेली जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या धडकमधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जान्हवी आणखी काही चित्रपट केले. आता राजकुमार राव सोबत तिची मु्ख्य भूमिका असलेला ‘मिस्टर अॅण्ड मिसेस माही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोलापूरमधील जान्हवी कपूर फॅन ग्रुपने चित्रपटगृह तीन दिवसासाठी बुक केले आहे.  

धर्मराज गुंडे , तन्वीर शेख यांच्या ग्रुपने थिएटरमधील तीन दिवसांचे एकूण 18 शो पूर्णपणे बुक केले आहेत. त्यासाठी जान्हवी कपूर फॅन क्लबला 6 लाखांचा खर्च आला आहे. या तीन दिवसांत सोलापुरातील आश्रम शाळा, अनाथ आणि वंचित मुलांना सांभाळणाऱ्या संस्था, गरीब महिला यांना हे चित्रपट मोफत दाखवण्यात येतं आहेत. सुमारे 5 हजार तिकीट मोफत देण्यात आली आहेत. लोकांना या चित्रपटातून प्रेरणा मिळावी आणि आपण जान्हवी कपूरचे चाहते असल्याने हा उपक्रम राबवला असल्याचे धर्मराज गुंड यांनी सांगितले.