सांगोला मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षात कुरबुरी सुरू असतानाच आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंडाचा झेंडा फडकावला आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे.जागा वाटप होण्यापूर्वीच आडम मास्तरांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडीत असलेल्या माकपने सोलापूर शहर मध्य मतदारसंघ माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासाठी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर ठाम आहे, त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आपल्याला सुटणार नाही, हे ओळखून माजी आमदार नरसय्या आडम यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.माकपचे माजी आमदार नरसय्या आडम निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
त्यातून त्यांनी महाविकास आघाडीचे जगावाटप होण्याअगोदरच निवडणूक अर्ज भरण्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली. येत्या 28 तारखेला माजी आमदार नरसय्या आडम हे हजारो कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत माकपकडून अर्ज दाखल करणार आहेत.
