धैर्यशील माने मंत्रीपदाच्या शर्यतीत….

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाल्याने देशात एनडीएची सत्ता पुन्हा आल्यास हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने (Hatkanangale MP Dhairyasheel Mane) यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा त्यांनी मिळवलेला विजय, पश्‍चिम महाराष्ट्रात शिंदे गटाचे एकमेव खासदार, चांगले भाषण कौशल्य, विषयांची जाण या जोरावर ते मंत्रिपदाचे दावेदार होऊ शकतात.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान द्यायचे झाल्यास शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत, अनुभवी श्री. वायकर, दुसऱ्यांदा विजयी झालेले बारणे यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो; पण पश्‍चिम महाराष्ट्रात पक्षवाढीचा विचार डोळ्यापुढे ठेवून मंत्रिपद द्यायचे झाल्यास माने हे एकमेव उमेदवार आहेत. त्यात शिंदे यांनी त्यांच्यासाठी मोठ्या जोडण्या मतदारसंघात लावल्या होत्या. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशीही त्यांचे मैत्रीचे संबंध आहेत. स्वतः शिंदे मुख्यमंत्री असल्याने पुन्हा मुलाला केंद्रात मंत्रिपद मिळेल का याची शाश्‍वती नाही. त्यातून माने यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.