इचलकरंजीचा पाणी पुरवठा पुन्हा होणार विस्कळीत!


इचाल्कारांजीत पाण्याचे संकट अजूनही टळले नाही. पाणी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तशातच सतत लागणाऱ्या गळतीने नागरिक खूपच त्रस्त झालेले आहेत. आता पुन्हा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा गळतीचे ग्रहण सुरू झाले आहे. मजरेवाडी येथील उपसा केंद्रापासून काही अंतरावर बस्तवाड असलेल्या कुरुंदवाड रोडवर गळती लागली आहे. त्यामुळे कृष्णा योजनेतून करण्यात येणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून तातडीने गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले असून शहरातील पाणी पुरवठा पून्हा विस्कळीत झाला आहे.

शिरढोणमधील बाणदार हायस्कूलजवळ शेतात जलवाहिनीला चार दिवसांपूर्वी मोठी गळती लागली होती. ही गळती काढण्याचे काम बुधवारी पूर्ण झाले होते. त्यानंतर पून्हा कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला होता. मात्र आज पून्हा या जलवाहिनीला नविन ठिकाणी मोठी गळती लागली. त्यामुळे आज पहाटेपासून पून्हा एकदा कृष्णा योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

सततच्या गळतीच्या संकटामुळे महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे शहरात नागरिकांना सतत पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गळतीमुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्यांमुळे नागरिकांचेही वेळापत्रक बिघडत आहे. दरम्यान, गळती काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.