आयजीएममध्ये होणार २४ तास रक्त तपासणी

कोल्हापूर जिल्ह्यात सीपीआर रुग्णालयानंतर मोठे शासकीय रुग्णालय म्हणून इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयाकडे पाहिले जाते. रुग्णालयात अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच ३०० बेडची मंजुरी मिळाल्याने रुग्णालयाची वाटचाल मल्टिस्पेशालिटीकडे होत आहे. रुग्णालयात होत असलेल्या सुधारणेमुळे अत्यावस्थेत असलेले रुग्णही दाखल होत आहेत. अशा रुग्णांवर तत्काळ उपचार होणे आवश्यक असते. योग्य उपचारासाठी रुग्णाच्या रक्ताचे अहवाल महत्त्वाचे असतात.

सध्या आयजीएम रुग्णालयातील प्रयोगशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. परिणामी सायंकाळी ५ नंतर आलेल्या रुग्णांना रक्ताच्या चाचणी अहवालासाठी दुसऱ्‍या दिवसाची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारास मर्यादा होती. इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात १ जूनपासून २४ तास रक्त तपासणी सुरू ठेवण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाने संबंधित विभागास केल्या आहेत. त्यानुसार लॅब टेक्निशयन यांच्या वेळा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

त्यामुळे काही दिवसांत आयजीएममध्ये २४ तास रक्त तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे रुग्णालयात रात्री-अपरात्री आलेला रुग्ण रक्ताच्या अहवालाअभावी योग्य उपचारापासून वंचित राहणार नाही. २४ तास प्रयोगशाळा सुरू ठेवण्यात येत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.सध्या आयजीएम रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या वेळेत बदल करून तीन शिफ्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्त तपासणी लॅब २४ तास सुरू राहणार आहे. त्याचा फायदा इचलकरंजी शहर परिसरातील रुग्णांना होणार आहे.