अलीकडच्या काळात सामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. दिवसेंदिवस अनेक दरात महागाई होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. श्री संत सेना महाराज सेवा मंडळ नाभिक समाज आणि इचलकरंजी शहर व परिसर नाभिक सेवा संघाच्यावतीने झालेल्या बैठकीत केशकर्तनाचे दर ३० टक्क्यांनी वाढविण्यात आले आहेत. यासंदर्भातील पत्रक दोन्ही संघटनेच्या अध्यक्षांनी काढले आहेत.
केशकर्तनासाठी ७० रुपयांऐवजी १०० रुपये आणि साध्या दाढीसाठी ५० रुपयांऐवजी ६० रुपये घेण्याचे निश्चित केले. या निर्णयामुळे केशकर्तनामध्ये ३० टक्क्यांची, तर दाढीमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली. बैठकीपूर्वी पुण्याचे उमेश जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रवींद्र क्षीरसागर, भरत मर्दाने, बाबूराव जाधव, जनार्दन सूर्यवंशी, आनंदा कीर्तने, मारुती काशीद, आदी उपस्थित होते.