फडणवीस राजीनाम्यावर ठाम, अमित शाहांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खालावलेल्या कामगिरीमुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 2019 साली भाजपाचे 23 खासदार होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रा भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. या पिछेहाटीमुळे पक्षातील नेत्यांना मोठा धक्का बसला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्याायची तयारी दर्शवली.

भाजपच्या संसदीय पक्षाची आज बैठक असून त्यासाठीच देवेंद्र फडणवीस हे काल संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले आहेत. आज ते अमित शाह यांची भेट घेणार असून राजीनाम्याची जी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यावर आज चर्चा होणार आहे.बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली होती. त्यानंतर काल अमित शहा यांनी फडणवीस यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांच्या मनात नेमकं काय आहे ते, त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या. सविस्तर माहिती जाणूनघेतली.

आणि या मुद्यावर दिल्लीत आल्यावर, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असेही शाह यांनी फडणवीस यांना काल सांगितलं.अखेर आज ते नरेंद्र मोदी तसेच अमित शाह यांची भेट घेतील, राज्यातील पराभवाच्या कारणांची समीक्षाही केली जाईल. फडणवीस हे राजीनामा देण्यावर ठाम आहेत. मात्र त्यांनी राजीनामा दिला तर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मन वळवण्यात या दोन्ही नेत्यांना यश मिळतंय का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. एकंदरच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढे काय घडतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.