महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह असून लवकरच पुन्हा एक नवा धक्का महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशाही चर्चा रंगल्या आहेत.
लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल यादरम्यान, एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रामुख्यानं मुंबईआणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहे, अशी माहिती मिळत आहे. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.