सध्या मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. काही ठीकाणी रिपरिप तर काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. इस्लामपूर शहराला गुरुवारी दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने पुन्हा झोडपून काढले. सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील नाले, गटारी तुंबल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत होते. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना कसरत करावी लागली. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उकाड्यातही वाढ झाली होती.
दुपारी सव्वा तीनच्या सुमारास मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वादळी वाऱ्यानेही हजेरी लावली. मुसळधार पावसाने शहर जलमय झाले. दुसऱ्या इस्लामपुरात तासाभराच्या पावसाने शहरवासीयांचे हाल झाले. जनजीवन विस्कळीत झाले होते. शाहूनगर, अंबिका देवालय, ताकारी रस्ता, केएनपी नगर, आष्टानाका व इतर अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने पाणी साचून राहिले होते. आष्टानाका परिसरात गुडघाभर पाणी साठले होते.