वैद्यकीय व्यवसायासाठी एमआरआय मशीन विकत घेण्याकरिता पंढरपूर येथील नावे असलेल्या जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये, म्हणून त्रास देऊन डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर सांगोला येथील डॉक्टर पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत, मृत डॉ. ऋचा हिचा भाऊ ऋषिकेश संजय पाटील (रा. पद्मावती प्लाझा मार्ग, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी पती डॉ. सूरज भाऊसाहेब रुपनर (रा. फॅबटेक कॉलेज मागे, सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीने तक्रारीत आरोपी हा व्यभिचारी वागणूक करीत असल्याचे मिळून आल्याने पत्नीने पतीला जाब विचारला. पतीने तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मानसिक त्रास देऊन तुला बघून घेतो. अशी धमकी दिली होती. आरोपीस वैद्यकीय व्यवसाय करिता एमआरआय मशीन विकत घेण्यासाठी ऋचा हिच्या नावे असलेली पंढरपूर येथील जमिनीवर कर्ज काढून किंवा माहेरच्या लोकांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी केली.
तिने पतीला जाब विचारला होता. त्यावेळी आरोपीने तू आत्महत्या कर नाहीतर पैसे आणून दे, अशी चिथावणी दिल्याने डॉ. ऋचा रुपनर हिने गुरुवार ६ जून रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान घरी डायनिंग हॉलमधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.