इचलकरंजीत खाद्यतेलाच्या तुटवड्यामुळे दुकानदार, ग्राहकांची तारांबळ!

ऐन सणासुदीच्या काळामध्ये इचलकरंजी शहरांमध्ये खाद्यतेलाची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकांची देखील तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. बडे व्यापारी व मॉल यांच्या संगमताने मागणीच्या प्रमाणात मोठ्या अवाजवी दराने खाद्यतेलाची सध्या विक्री केली जात आहे. तर 1450 ला मिळणारा तेलडबा हा 1700 ते 1750 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत खाद्यतेलांचे दर निश्चित करण्यात आले नव्हते. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात असलेला तेलसाठा तसाच ठेवून आपल्या वस्तूची किंमत वाढविण्यात ते यशस्वी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्याला अन्न व औषध प्रशासनाकडून कोणताच वचक ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांवर तेलाविना अन्नपदार्थ शिजवण्याची वेळ आलेली आहे. वेगवेगळ्या कंपनीच्या डीलर यांच्याशी किरकोळ दुकानदार यांनी संपर्क केला असता त्यांना नो रेट नो बुकिंग अशा सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते बुचकळ्यात पडलेले आहेत.