उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे. समांतर जलवाहिनीचे काम ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.तत्पूर्वी, प्रशासनाला सर्व अडथळे दूर करावे लागणार आहेत. सोलापूर शहराला एक-दोन दिवसाआड किंवा नियमित पाणीपुरवठा करण्याचे महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोलापूर ते उजनी ११० किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे.
आतापर्यंत ८८ किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने सुरू आहे. पण, आता पावसामुळे चिखल झाल्याने काही ठिकाणी काम थांबले आहे. पावसामुळे कामाला अडथळा येऊ नये म्हणून महापालिकेचे अधिकारी सुरवातीला काळी माती असलेल्या ठिकाणचे काम पूर्ण करीत आहेत. समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुधारेल, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण अपेक्षित असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी जॅकेवलचे काम पूर्ण केले जात आहे.