मंगळवार सकाळपासूनच सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागात रिमझिम पाऊस सुरू होता. मात्र दुपारनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. दुपारी तीननंतर पावसाने शहरात जोरदार बॅटिंग सुरू केली.यंदा रोहिणी व मृग नक्षत्रात सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. मागील सात दिवसात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील आठवड्याभरात १४६.५८ म्हणजेच सरासरी १५०.५ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. त्याबाबतची आकडेवारी मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली.सोलापूर शहरात सोमवारी रात्री अकरा वाजेपासून मंगळवारी दुपारी दोन वाजता पावसाची संततधार सुरू होती. त्यानंतर म्हणजेच दुपारी तीन वाजेनंतर सोलापुरात पावसाने चांगलाच जोर धरला. या पावसाच्या पाण्यामुळे शहरातील विविध भागात पाणीच पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.